Monday 25 May 2015

योग - भाग १

तसं दोघांचं दूरचं नातं लागत होतं एकमेकांशी. श्वेता आठवी-नववीत असताना तिने त्याला पहिल्यांदा पाहिलं. छान गोरापान उंचापुरा होता तो, तर ती तशी दिसायला सुमार! तोही अकरावी-बारावीत असेल तेव्हा, निखिल सरपोतदार. निखिल नाशिकचा त्यामुळे पुण्यात येणंजाणं तसं कमीच व्हायचं. पण ती ज्या घरात राहत होती तिथल्या आजीबाई त्याच्या आईच्या मावशी. त्यामुळे पुण्यात आल्यानंतर भेट तर व्हायचीच.  आला की त्याचं तिच्याबरोबर पेपर मधली शब्दकोडी सोडवणं, तिच्या लहान भावाबरोबर सुमीतबरोबर बुद्धिबळ खेळणं, सगळ्यांशी हसून, मिळून मिसळून बोलणं तिला छान वाटायचं. येउन गेला की एखाद-दोन दिवस त्याची आठवण मनात रुंजी घालायची, की परत त्याच्याबद्दल ती विसरून जायची. निखिलचा बारावीचा निकाल लागल्यावर पुण्यात Engineering च्या प्रवेशासाठी म्हणून त्याच्या वडिलांबरोबर आला तो. पण गुण कमी असल्याने प्रवेश काही मिळाला नाही.

तिच्या आई-वडिलांचं एकमेकांशी मुळीच पटायचं नाही. घरच्या बेताच्या परिस्थितीला श्वेताचे वडीलच कारणीभूत असल्याचं आईचं ठाम मत, आणि कित्येक लहान-सहान कारणांवरून घरात कायम कलह. सरकारी नोकरीच्या हव्यासापायी वडिलांची छोट्या-मोठ्या नोकऱ्यांमध्ये धरसोड, पर्यायाने सतत उधारी-उसनवारी पाचवीला पुजलेली! कसाबसा आजीबाईंनी राहण्यासाठी पुण्यासारख्या ठिकाणी आसरा दिलेला तीच काय ती जमेची बाजू.

श्वेताची दहावीची परीक्षा पार पडली. घरी इतर लहान मुलांच्या शिकवण्या घेणं, पुस्तकांच्या घड्या घालायचं काम आणलं की ते करणं, शाळेत तीन किलोमीटर रोज चालत येणं-जाणं. आईला तात्पुरती नोकरी मिळाली की घरातही सगळं काम करणं आणि सुमीतचाही अभ्यास घेणं अशा धांदलीत देखील दहावीला ७९% गुण मिळवले. घरची परिस्थिती बेताचीच, त्यामुळे कुठे प्रवेश घ्यावा याबद्दल तिच्याही मनात संभ्रमच होता. Diploma in Engineering साठी Government Polytechnic मध्ये एका मामाच्या मदतीने Form भरला. अकरावी Centralized प्रवेशासाठी देखील Form भरला.

PPS ची विद्यार्थिनी असल्याने PPS मध्ये  ८५ टक्क्यांना प्रवेश बंद झाला असला तरी तिला शाळेचीच विद्यार्थिनी म्हणून प्रवेश मिळणार होता. PPS शहरातली एक नावाजलेली शाळा, इथे Junior college ला प्रवेश मिळण्यासाठी प्रत्येकाची चढाओढ लागे, PPS चा विद्यार्थी म्हणजे हुशार असं समीकरणच होतं. वडिलांनी सांगितल्याप्रमाणे तिने form मध्ये college preference दिला. PPS मध्येच प्रवेशाची तिची खूप इच्छा होती. ज्या दिवशी PPS मध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाचा शेवटचा दिवस होता त्या दिवशी तिच्या जवळच्या मैत्रिणीच्या बाबांनी येउन निरोपही दिला. मग हट्ट करून तिने बाबांना शाळेत नेलं. बाबा Prinicipal च्या ऑफिसमध्ये गेले आणि काही वेळाने बाहेर आले.

श्वेताने विचारलं "काय झालं, प्रवेश नक्की झाला का?"
बाबांनी काहीच उत्तर न देता आत काय झालं ते सांगायला सुरुवात केली आणि म्हणाले, "तुमच्या सरांनी आतमध्ये आम्हा १५ जणांना एक लेक्चर दिलं, त्यामध्ये त्यांनी सांगितलं की  इथे शाळेतली १०-१२ मुलंच प्रवेश घेऊ शकतील, ज्यांना ७७ टक्क्यांपेक्षा अधिक गुण आहेत ती! पण इतर २०० मुलं सगळी ८५-९० टक्क्यांच्या पुढची असणार आहेत, शिक्षकदेखील त्या स्पीडने शिकवणार आणि त्यांच्याबरोबर या मुलांना जुळवून घ्यायला कठीण जाईल असं आमचं आजपर्यंतचं निरीक्षण आहे. आता याउपरही तुम्हांला इथेच प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता."

क्रमश:

No comments:

Post a Comment