Tuesday 26 May 2015

योग - भाग २

 
"मग काय करायचं?" - श्वेता 
"मला तरी वाटतं नको घ्यायला इथे प्रवेश" - बाबा. "आणि तसंही प्रवेश घ्यायचाच असेल तर आजच तीन हजार रुपये भरून प्रवेश नक्की करायचा आहे, दुपारी एक पर्यंतच! तेही शक्य होईल असं वाटत नाहीये. शिवाय polytechnic ला प्रवेश घेतला तर इथले पैसे सगळेच्या सगळे परत मिळणार नाहीत."
आता मूळ मुद्दाच समजल्यावर श्वेता पुढे काहीच बोलू शकली नाही. फक्त शहरातल्या सर्वोत्तम Junior college मध्ये शिकता येणार नाही हा सल मात्र राहिला. Polytechnic च्या प्रवेश फेऱ्या अजून सुरूच झाल्या नव्हत्या, त्यामुळे तिथे काय होईल, कोणती शाखा मिळेल काहीच अंदाज नव्हता.
 
अकरावीच्या centralized प्रवेशाची यादी जाहीर झाली. पहिल्या क्रमांकावर PPS नाव दिलं होतं ते अर्थातच मिळालं नाही. दुसऱ्या क्रमांकावर नाव दिलेल्या कॉलेजात मात्र सहज प्रवेश मिळत होता, तिथे प्रवेश ७५% ना बंद झाला होता. दुसऱ्या दिवशी कॉलेजात प्रवेश घेण्यासाठी गेल्यावर समजलं की तिथली फी सहा हजाराच्या आसपास आहे. झालं, आली परत पंचाईत. वडिलांनी आता पुन्हा दुसरं कारण पुढे केलं की, "हे कॉलेज रोजच्या प्रवासाच्या दृष्टीने सोयीस्कर नाही, तू रोज इतक्या दूर कशी ये-जा करणार? त्यापेक्षा गोखले महाविद्यालयात आपली ओळख आहे. तिथे बघू आपण प्रवेशाचं काहीतरी."
"पण बाबा, आपण तर यादीमध्ये गोखले महाविद्यालयाचं नाव दिलंच नाहीये, मग कसा मिळेल तिथे प्रवेश?"
"मिळेल, तू नको काळजी करूस."
 
एव्हाना polytechnic च्या फेऱ्याही सुरु झाल्या. तिसऱ्या फेरीनंतर श्वेताचं नाव यादीत वर वर सरकू लागलं. लेडीज कोटा होताच. तिला या "लेडीज कोटा" प्रकाराबद्दल फार गंमत वाटे. आपण कोणीतरी स्पेशल ट्रीट केलं जातोय याचाही आनंद होताच, पण यातून का होईना प्रवेश नक्की मिळेल ही खात्री होती. आणि शेवटी मुलाखतीचा दिवस उजाडला. Mechanical शाखा मिळत होती. सर्वांनी आधीच सांगितलं होतं की civil/mechanical असं काही घेऊ नको, मुलींसाठी तिथे फार स्कोप नसतो. श्वेताला तर Computer किंवा Electronics च हवं होतं. तिथल्या सरांनी सांगितलं की, या शाखांसाठी ६व्या फेरीपर्यंत थांबावं लागेल. आणि तेव्हादेखील इतरांनी आपला प्रवेश रद्द केला तरच नंबर लागेल. दुसरा पर्याय असा आहे की, पहिल्या वर्षाचा सर्व शाखांचा अभ्यासक्रम सारखाच असतो, तेव्हा पहिल्या वर्षात ज्यांना आरक्षणामुळे किंवा payment seat मुळे प्रवेश मिळाला आहे, त्यांना अभ्यासक्रम झेपला नाही, आणि ते पहिल्या वर्षात नापास झाले, तर इतर शाखेच्या toppers ना दुसऱ्या वर्षी हवी ती शाखा बदलून मिळेल. सगळा नशिबाचाच भाग, पण पुन्हा एकदा पाचेक हजार रुपये त्याच दिवशी भरायची वेळ आली आणि नशिबापुढे पैसा पुन्हा एकदा वरचढ ठरला. 
 
ना अकरावीसाठी हवं होतं ते कॉलेज मिळालं, ना preference यादीमध्ये नाव दिलं होतं तिथे प्रवेश घेतला, ना polytechnic ला. जणू तिच्या आयुष्याचीच नकारघंटा वाजायला लागण्याची सुरुवात होती ही. अर्थात तिची सकारात्मक विचारशक्ती मात्र तिच्याकडून कोणीच हिरावून घेऊ शकत नव्हतं, ना नशीब, ना पैसा!
 
क्रमश:

No comments:

Post a Comment